शरद पवारांची नवी खेळी, रक्षा खडसे विरोधात देणार हा उमेदवार

जळगांव : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. सध्या राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. अजूनही राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही.
मात्र काही ठिकाणी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं ते रावेर लोकसभा मतदारसंघाकडे. या मतदारसंघात भाजपानं रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माजी मंत्री एकनाथ खसडे किंवा त्यांची मुलगी रोहिनी खडसे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे या मतदारसंघात सुनेविरोधात सासरा किंवा नणंद विरोधात भावजई अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता होती. मात्र या निवडणुकीतून एकनाथ खडसे यांनी आजारपणाचं कारण देत अचानक माघार घेतली.
दरम्यान एकनाथ खडसे यांनी माघार घेतल्यानंतर या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संतोष चौधरी यांचे बंधू व प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी याबाबत माहिती दिली.
संतोष चौधरी यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याआधीच भुसावळमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. संतोष चौधरी हे जरी राष्ट्रवादीमध्ये असले तरी अनिल चौधरी हे प्रहार जनशक्ती पक्षामध्ये आहेत. मात्र याबाबत आपण बच्चू कडू यांना माहिती दिली असून, आपल्या भावाचा प्रचार करून मोठ्या मताधिक्याने संतोष चौधरी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे.