
कराड : येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेत तब्बल १३ कोटी ९ लाख ९६ हजारांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतसंस्थेच्या अठरा संचालकांसह पाच कर्मचाऱ्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोवीसजणांनी मिळून पतसंस्थेत अपहार केल्याचा आरोप आहे. याबाबत विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी फिर्याद दिली आहे.
शरद गौरीहर मुढेकर, शंकर मनोहर स्वामी, महादेव मल्लाप्पा बसरगी, दिपक मारुती कोरडे, उमेश वसंतराव मुंढेकर, सतिश चंद्रकांत बेडके, मिलींद रामचंद्र लखापती, मनोज चंद्रकांत दुर्गवडे, वृषाली विश्वास मुंढेकर, सिंधू अमोल जुगे, शंकर नागप्पा घेवारी, सर्जेराव सोमनाथ लोकरे, वसंत कृष्णा काळे, श्रीकांत विठोबा आलेकरी, शिवाजी हणमंतराव पिसाळ, महेश लक्ष्मण शिंदे, प्रेमलता चंद्रकांत बेंद्रे, महालिंग तुकाराम मुंढेकर, तात्यासासाहेब आबासाहेब विभूते शिवाजी भाऊ मानकर, चंद्रकांत गणपती दुर्गवडे आदी संचालकांसह व्यवस्थापक रविंद्र मुरगेंद्र स्वामी, कर्मचारी नितीन रामचंद्र चिंचकर (रा. कालवडे), संग्राम शंकर स्वामी (सध्याचे व्यवस्थापक), सुभाष महादेव बेंद्रे (रा. रविवार पेठ, कराड), ज्ञानेश्वरी भिकोबा बारटक्के (रा. रविवार पेठ, कराड), दत्तात्रय रघुनाथ शिंदे (रा. कोडोली) व सुनिल आनंदा काशिद (हवेलवाडी-सवादे, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी संचालक शिवाजी मानकर, चंद्रकांत दुर्गवडे व व्यवस्थापक रविंद्र स्वामी यांचे निधन झाले आहे.
विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिवशंकर पतसंस्थेत १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ अखेरचे वैधानिक लेखा परिक्षण झाले. त्या अहवालानुसार पतसंस्थेत पतसंस्थेत १३ कोटी ९ लाख ९६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका आहे. त्यानुसार संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्या आर्थिक नुकसानीस वरील संचालक व कर्मचारी वैयक्तीक तसेच सामुहीकरित्या जबाबदार आहेत. विश्वासघात, फसवणूक करून संचालक मंडळाने हेतु पुरस्सर नियमबाह्य व पदाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने तब्बल ११ कोटी ५३ लाख १६ हजार ९१५ रूपयांचा अपहार केला आहे. त्यासह ठेव नसताना ठेव तारणाच्या नावाखाली तब्बल १ कोटी ५६ लाख ७९ हजारांचे कर्जही वितरण केले आहे.
विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कराड शहर पोलिसांनी तब्बल चोवीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड तपास करीत आहेत.