
कराड : दुचाकी नीट चालवता येत नाही का, असे म्हणून युवकावर चाकूने वार करण्यात आले. मलकापूर येथील कन्या शाळेसमोर रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मुजम्मिल रियाज शेख (रा. संस्कृती सिटी अपार्टमेंट, मलकापूर) याने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निरंजन थोरात (रा. बागल वस्ती, मलकापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापुरातील संस्कृती सिटी अपार्टमेंटमध्ये राहणारा मुजम्मिल शेख आणि त्याचा मित्र मुजाहिद मुजावर हे दोघेजण दुचाकीवरून आईस्क्रीम खाण्यासाठी बैलबाजार मार्गाकडे निघाले होते. मलकापुरातील कन्या शाळेसमोर रस्त्यावर गतिरोधक असल्याने मुजमिल शेख याने दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी समोरून आलेल्या निरंजन थोरात याने मुजम्मिल याच्याकडे पाहत दुचाकी नीट चालवता येत नाही का, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच मुजम्मिल याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. मुजम्मिल याने चावी मागितल्यानंतर त्याने स्वत:जवळील चाकू काढून मुजम्मिल याच्यावर वार केले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. याबाबत मुजम्मिल शेख याच्या फिर्यादीवरून निरंजन थोरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सिकंदर शेख तपास करीत आहेत.