सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक
कराडात शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई, हत्यार व रोकड जप्त

कराड ः कोयत्याने वार करीत गंभीर जखमी करून सोनसाखळी चोरून नेलेल्या सराईत दोन गुंडांना कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून हत्यार व रोकड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अशोक नंदाप्पा बिराजदार (रा. शनिवार पेठ, कराड), जावेद गणी सुतार (रा. रत्नागिरी गोडावूनचे मागे कराड) अशी अटक केलेल्या सराईत गुंडाची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलकापूर येथील गोविंद बाबुराव पवार हे 19 ऑक्टोबर 2023 रोजी रात्रीचे जेवणानंतर फेरफटका मारत होते. यावेळी मलकापुर शहराच्या हद्दीत हॉटेल सफायरजवळ रोडवर अनोळखी इसमाने त्यांना अडवून कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न करून पवार यांच्या गळ्यातील सुमारे 5 तोळे सोन्याची चेन हल्लेखोर जबरीने तोडुन चोरुन नेत असताना गोविंद पवार यांनी आरडाओरडा करून चेन हाताने पकडली. त्यामुळे चेन तुटून सुमारे 3 तोळे 3 ग्रॅम वजनाची व अंदाजे 1 लाख 32 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन चोरटयाने तोडुन जबरीने चोरुन नेली. याबाबत कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी यांनी गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या टीमला सूचना दिल्या होत्या. फिर्यादीने चोरटयाचे दिलेले वर्णनावरून व गोपनीय बातमी मिळवून डीबीच्या पोलीस पथकाने रेकॉर्डवरील संशयीत अशोक बिराजदार व जावेद सुतार या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल तपास केल्यावर त्यांनी गुन्हा केलेची कबुली दिली असून त्यांनी गुन्ह्यातील चोरलेला सोनसाखळी हस्तगत करण्यात आलेली आहे. याशिवाय दोन्ही संशयितांकडून कराड शहर आणखी एका गुन्हेतील चोरीची व 20 हजार रुपये किंमतीची जुपीटर मोटार सायकल तसेच आणखी एका चोरीच्या गुन्ह्यात पानटपरीतून चोरलेल्या साहित्यांपैकी काही साहीत्य असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते, पोलीस उपनिरिक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, प्रशांत वाघमारे, महिला पोलीस सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली आहे.