
महाबळेश्वर : महाबळेश्वर महाराष्ट्रातले पहिल्या पसंतीचे पर्यटनस्थळ दिवाळी हंगामासाठी सज्ज झाले आहे. पावसाळ्याची कात टाकून रंगरंगोटीने सजून महाबळेश्वर बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे.
नुकताच पावसाळा संपला आणि दसऱ्यापर्यंत येथील नागरिक साफसफाई करून दिवाळी हंगामाच्या तयारीत असतात. त्यानंतर नवीन मालाची खरेदी करून बाजारपेठ दिवाळीच्या तयारीत पर्यटकांची वाट बघत असतात. यावेळी लक्ष्मीपूजनपर्यंत पर्यटकांची तुरळक गर्दी दिसत होती.
आता पर्यटक बाहेर पडले असून, आज येथील बाजारपेठ पर्यटकांनी भरून गेल्याने व्यापाऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाले असून, दिवाळी हंगामासाठी सर्वजण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या अद्याप थंडी नसल्याने येथील आल्हाददायक वातावरणाचा आनंद बाजारपेठेत फेरफटका मारताना पर्यटक घेताना दिसतात, तर महिलांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे.
सध्या महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामासाठी गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. तसेच बाजारपेठेत देखील पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी दिली.