मराठे ओबीसीत जाणार असे माहिती झाल्यापासून काहींचा तिळपापड झालाय
मनोज जरांगे-पाटील यांची मंत्री छगन भुजबळवर सडकून टीका

कराड ः सरकारने नेमलेल्या समितीला राज्याचा दर्जा दिला. आज लाखाने नोंदी सापडू लागल्या आहेत. लेकरांच्या पदरात आता फायदा पडणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि मराठे ओबीसीत जाणार असे माहिती झाले आहे. तेव्हापासून काहींचा तिळपापड झाला आहे. माझ्या जातीच्या आड कोणी आला तर मी सोडणार नाही, असा इशारा मराठा योद्धे मनोज जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ आणि सरकारला दिला.
कराड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांना सुबुध्दी द्यावी, अशी प्रार्थना केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. जरांगे पुढे म्हणाले, मराठ्यांचे आरक्षण 1805 पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर 70 वर्षे कोणी लपवून ठेवले? याचे आता उत्तर पाहिजे. ज्यावेळी आरक्षणासाठी समिती नेमली. त्या-त्यावेळी मराठ्यांना आरक्षण नाही, असे सांगण्यात आले.
आता पुरावा सापडू लागल्यावर मराठ्यांचे आरक्षण दबावामुळे लपवून ठेवले हे स्पष्ट झाले आहे. ते का लपवून ठेवले याचे उत्तर मिळाल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. आपल्या मायबापाने काबाडकष्ट करुन पोरांना शिकवले. परंतु ना बापाचे, ना पोराचे स्वप्न पूर्ण झाले. आरक्षण नसल्याने स्वप्नांची राखरांगोळी झाली, आयुष्य उद्ध्वस्त झाले, असेही ते म्हणाले.