
कराड, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यात जमा आहे, त्यामुळे काहीही करा, समाजात फूट न पडू देता समाजाची एकजूट वाढवा. गावची गाव जागी करा. मराठ्यांच्या लेकरासाठी, कल्याणासाठी सर्व समाजाने एकजूट राहा. मराठा समाजासाठी, समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी एक इंच ही मागे हटणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही असा शब्द मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी विराट सभेत दिला. दरम्यान मराठा आता आरक्षणात गेला आहे हे माहिती झाल्यामुळे राज्यात जातीय दंगली घडविण्याचा काही जणांनी डाव आखला आहे असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेले दोन दिवसापासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कराड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर शुक्रवारी रात्री सात वाजता आयोजित केली होती. ही जाहीर सभा प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनानंतर मध्यरात्री एक वाजता सुरू झाली. तोपर्यंत सकल मराठा समाजाचे स्थानिक कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटी येथून आलेले मराठा बांधव व महिला भगिनी यांनी सभेला संबोधले.
सायंकाळी सात वाजता ही सभा होणार होती त्यामुळे सहा वाजल्यापासूनच कराड व पाटण तालुक्यातून मराठा समाजाचे लोक महिला भगिनी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील सभेत दाखल होत होत्या. प्रचंड थंडीतही हे मराठा बांधव व भगिनी मनोज जरांगे पाटील यांना यायला पाच ते सहा तास उशीर होणार आहे हे माहीत असूनही त्यांना ऐकण्यासाठी तितक्याच जोशाने सवेस्थळी वाट पाहत होत्या. इस्लामपूर येथील सभा आटपून मनोज जरांगे पाटील हे राात्री एक वाजून पाच मिनिटांनी सभास्थळी दाखल झाले. एक मराठा लाख मराठा.. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवाजी, जय भवानी.. मनोज जरांगे-पाटील साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. या घोषणांनी मराठा समाजाने सभास्थळ दणाणून सोडले. त्यानंतर मंचावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून झाल्यानंतर प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाली.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, कराड मधील सभा सातची. ती सुरू व्हायला सहा ते सात तास उशीर झाला आहे, याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. पण मी तरी काय करणार, प्रत्येक गावागावात मराठा समाज हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उभा आहेत. आज तुम्ही या सभेला आलात पण या सभेला मी सभा मानत नाही, तुमच्या लेकरांच्या वेदना घेऊन आज तुम्ही इथे आला आहात. आत्तापर्यंत आपण आपल्या मराठा आरक्षणाची लढाई सत्तर टक्के जिंकली आहे, 30 टक्के लढाई अजून बाकी आहे.
आत्तापर्यंत मराठा आरक्षणाचा विषय आला की पुरावे सापडत नाहीत त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देता येत नाही असे सांगितले जात होते. षडयंत्र रुचून मुद्दामून मराठ्यांना आरक्षण दिले गेले नाही. मग बघा सरकारवर किती मोठा दबाव टाकण्यात आला होता. मराठ्यांच्या आंदोलनानंतर मराठ्यांचे पुरावे आत्ता सापडू लागले आहेत. मग 70 वर्षात हे पुरावे कोणी दाबले ? याचे नाव आता आम्हाला सांगितले पाहिजे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी एकजूट केली आणि आपल्या एकजुटी पुढे सरकारला नमत घ्यावे लागले आणि नेमलेली समिती काम करू लागली. 1963 आणि त्यापूर्वीच्याही, 1967 ते 2023 पर्यंत पुरावे शोधण्याचे काम सुरू झाले. आता समितीला लाखोने मराठ्यांचे पुरावे सापडायला लागले. याचा अर्थ मराठ्यांना पूर्वीपासूनच आरक्षण होते पण त्याचे पुरावे कोणीतरी लपवून ठेवले होते. त्यामुळे ते सापडत नव्हते. हे आरक्षण जर पूर्वीच आम्हाला मिळाले असते तर जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून पुढे आले असती.
1967 ला शासनाने एक निर्णय घेतला आणि शेकडो जातींना आरक्षण दिले गेले. हे आरक्षण व्यवसायाच्या आधारावरच वाटप झाले. खैरात वाटल्यासारखे आरक्षण वाटले गेले यातील 16 टक्के आरक्षण हे मराठ्यांच्या वाट्याचं होतं ते देखील इतरांना एका रात्रीत देऊन टाकले. या आरक्षणाने मराठ्यांच्या पोरांचा घात केला, तरीही मराठा समाज झोपलेलाच आहे. मी उपोषणाला बसलो होतो तेंव्हा एक मंत्री आले मला म्हणाले , तुम्हाला कुणबी आरक्षण देता येत नाही’, मग मी त्यांना म्हटले तुमची जात कशाच्या आधारे आरक्षणात गेली ते अगोदर सांगा. विदर्भातील मराठ्यांना आरक्षण देताना कोणता निकष लावला गेला. पोट जातीच्या आधाराने आरक्षण दिले गेले असेल तर कुणबी ही मराठ्यांची पोट जात होत नाही का? असे मी म्हटले. हे ऐकून ते नेते, अधिकारी निघून गेलं.
माझे पहिल्या टप्प्यातील आंदोलन सुरू असताना हैदराबादच्या निजाम संस्थांनाकडील नोंदीवरून आमच्या भागातील मराठ्यांना कुणबी नोंदीचे दाखले देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असा यामुळे भेदभाव होऊ शकतो हे सरकारला सांगत सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावेत आणि ओबीसी 50 टक्क्याच्या आत मधून आरक्षण देण्याची विनंती केली. आता तर ज्यांचे पुरावे सापडले आहेत त्यांना कुणबी दाखले मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र ज्यांच्या नोंदी नाहीत, पुरावे नाहीत त्यांनी घाबरून जायचे काही कारण नाही कारण त्याच अहवालाच्या आधारे कायद्यानुसार तुम्हाला कुणबी आरक्षण देण्यात येणार आहे.
मराठा समाजाच्या नोंदी मोठ्या प्रमाणात गावागावात, तालुका तालुक्यात सापडू लागले आहेत, हे आपल्या आंदोलनाचे मोठे यश आहे. मात्र मराठा समाज हा ओबीसीत गेल्याने काहीजण याला विरोध करत आहेत. पण मराठा आरक्षणाला जर कोण विरोध करत असेल तर मग तो मराठा असो की अन्य कोणी आपण त्याला सोडतच नाही. एकीकडे घटनात्मक पद घ्यायचे आणि दुसरीकडे त्याच्या विरोधी वर्तन करायचे असे त्यांचे काम सुरू आहे. तुम्ही सभा घ्यायच्या तर घ्या पण विनाकारण समाजात द्व्ोष निर्माण करू नका. आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजा समाजात जाती-जातीमध्ये जातीय दंगली घडवण्याचा डाव दिसतो आहे असा आरोप मनोज जंगी पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता लगावला. तसेच मराठा समाजाने त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांचा डाव यशस्वी होऊ देऊ नका असे आवाहन ही केले. त्यांनाही माझे सांगणे आहे की, आमचा नाईलाज करू नका अन्यथा जशास तसे उत्तर देण्याची वेळ आमच्यावर येईल, असेही ते म्हणाले.