
कराड : कराड तालुक्यात एकदा मंडल अधिकारी म्हणून बदली करून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यास सातारा जिल्ह्यात सहजासहजी कराड सोडून दुसऱ्याकडे काम करण्याची इच्छा होत नाही असे दिसत आहे. कराड तालुक्यातील लोकांच्या प्रेमापोटी की अनेक कोणत्या गोष्टीमुळे परंतु महसूल खात्यात काम करायचे म्हटले की प्रथम कराड तालुका सगळ्यांना दिसतो. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कराड तालुक्यात काही ठराविक मंडलात काम करायचे असेल तर त्यांची वरिष्ठ कार्यालयात व वरिष्ठांच्या बरोबर चांगले संबंध असायला लागतात नाहीतर तुम्हाला काम करण्याची कितीही प्रबळ इच्छा असूनही तुम्हाला सहजासहजी त्या मंडलामध्ये काम करण्याची संधी मिळू शकत नाही.
मुळात मंडल अधिकाऱ्यांच्या बदल्या या जिल्हा अधिकारी कार्यालयातून होत असतात. एका मंडलामध्ये तीन वर्ष काम केल्यानंतर त्यांची त्या मंडलामधून दुसरीकडे बदली होते. बदलीच्या वेळी त्यांच्याकडून पसंती विचारली जाते. त्यानुसार त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातून बदली करून घेण्यासाठी काय काय करावे लागते हे सगळ्यांनाच माहित आहे. उपविभागीय अधिकारी तहसीलदार व नायब तहसीलदार या अधिकाऱ्यांच्या तीन वर्षातून दुसऱ्या तालुक्यात अगर दुसऱ्या जिल्ह्यात बदल्या होतात तशा पद्धतीने मंडल अधिकाऱ्यांच्या तीन वर्षानंतर एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये बदल्या का करत नाहीत. काही मंडल अधिकारी तर 8 वर्ष झाली कराड तालुक्यातच वेगवेगळ्या मंडल मध्ये काम करत आहेत. नुसते कामच नाही तर त्यांना ज्या मंडल मध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांना त्याच मंडलात वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय काम करण्याची संधी मिळू शकत नाही.
त्यामुळे वरिष्ठांच्या आशीर्वादाने आलेल्या मंडल अधिकाऱ्यांच्या शब्दाला मोठीच किंमत असते. त्यामुळे त्यांनी काहीही भानगडी अथवा चुकीच्या गोष्टी केल्या तरी कनिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यावरती पांघरून घालावेच लागते. नाहीतर त्यांच्या शिफारशीसाठी वरिष्ठ अधिकारी अथवा पुढाऱ्याचा फोन आला म्हणून समजून जायचे त्याला कारण ही तसेच आहे.
कराड तालुक्यात गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करायची असेल तर वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी लोकांना वरिष्ठ कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाकडून मंडल अधिकाऱ्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सगळ्या कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतरच उत्खननासाठी व वाहतुकीसाठी परवानगी दिली जाते. परंतु, उंब्रज मंडल अधिकारी यांचा महसूल खात्यात एवढा मोठा वर चष्मा आहे की त्यांच्याकडून आलेल्या कामात कोणीच कोणत्याही गोष्टीची चूक काढण्याचे धाडस करत नसतील असेच या काही घटनेवरून दिसत आहे.
एखाद्या क्षेत्रातून मुरूम, दगड उत्खनन करण्याचे असल्यास वरिष्ठ कार्यालयात अर्ज केल्यानंतर मंडल अधिकारी यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर ज्या क्षेत्रातून मुरूम, दगड उत्खनन करण्याचे आहे त्या क्षेत्रातील सर्व लोकांची सहमती घेतल्याशिवाय परवानगी दिली जात नाही. परंतु उंब्रज मंडल मधील वीट भट्टी धारकांनी ज्या क्षेत्रातून माती उत्खनन केलेली आहे त्यांनी त्या क्षेत्रातील इतर लोकांची संमती घेतलेली नसताना तहसील कार्यालयातील गौण खनिज टेबलचे कर्मचारी ही कागदपत्रे असल्याशिवाय कोणतीच परवानगी देत नाही. तर मग उंब्रज मंडल मधील वीट भट्टी धारकांनी ज्या क्षेत्रातून माती उचललेली आहे त्या क्षेत्रातील इतर सह हिस्सेदार यांची संमती घेतली नसताना त्यांना माती उत्खनन करण्याची परवानगी का देण्यात आली.
मुरूम, दगड उत्खनन करणाऱ्यांना एक नियम व लाल माती उत्खनन करणाऱ्यांना एक नियम का याबाबत योग्य ती चौकशी होणार का ? की सातारच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने उंब्रज मंडल अधिकारी यांच्या मंडलामध्ये ते करतील तोच कायदा चालणार आहे याबाबत सर्वत्र चर्चा चालू आहे.
क्रमशः
उंब्रज मंडल अधिकारी यांनी केलेल्या चुकीच्या कामाच्या भानगडी…