
कराड : खा.श्रीनिवास पाटील यांनी सुचवलेल्या
सातारा लोकसभा मतदार संघातील कृष्णा कालव्यातंंर्गत ६० लाख खर्चाच्या विविध कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे कृष्णा कालव्यावरील अनेक गावच्या हद्दीतील विविध कामांना गती मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या कृष्णा कालव्याचे गत काही वर्षात नुकसान झाले आहे. कालव्यावरील बांधकामाचे नुकसान झाल्यामुळे सदरची कामे पूर्ण होणे आवश्यक होते. याविषयी कराड व शेणोली परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी ही कामे होण्यासंदर्भात खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार खा.श्रीनिवास पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून तशी मागणी केली होती. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाने गोटे, गोवारे, सैदापूर, कोडोली, रेठरे, कार्वे कोडोली, गोंदी आदी गावाच्या हद्दीतील कामासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये बिगर सिंचन प्रापणसुची अंतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची मंजूरी प्राप्त झालेली आहे.
यामध्ये कृष्णा कालवा गोवारे हद्दीतील बॉक्स कल्व्हर्टचे पुर्नबांधकाम करणे, गोटे हद्दीतील स्मशान भुमिकरीता कृष्णा नदीवर घाट बांधणे, कोडोली पोटपाट (वाखाण रोड) ठिकाणचे कॉंक्रिट अस्तरीकरण करणे, गोवारे हद्दीतील गावपूल दुरुस्ती करणे, सैदापूर हद्दीतील सी.डी. वर्क बांधकाम करणे, रेठरे येथील वितरीकांचे अस्तरीकरण करणे, कार्वे कोडोली व दुशेरे लघु वितरीका अस्तरीकरण करणे, गोंदी हद्दीतील सी.डी. वर्क बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे. यासाठी, ६० लाखाच्या अंदाजित रकमेची तरतुद करण्यात आली आहे. सदरच्या मंजूर कामांची निविदा पूर्ण करुन काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहीती टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडीचे कार्यकारी अभियंता रा.य.रेड्डीपार यांनी खा.श्रीनिवास पाटील यांना पत्राद्वारे कळवली आहे. दरम्यान ह्या कामांना मंजुरी मिळाल्याने स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.