
कराड ः महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाला मेट्रो पॉलीमॉलमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला मुंबईची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
कराड शेती उत्पन्न बाजार समिती व राज्य शासन कृषी विभाग यांच्या वतीने कराड येथे भरविण्यात आलेल्या 18 व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खा.श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ.निलमताई येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एम.मुल्ला, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, तहसीलदार विजय पवार, पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार, तालुका कृषी अधिकारी डी.ए.खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना.देसाई म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी बांबू लागवडीचा उपक्रम सातारा जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मी पालकमंत्री असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, वाशी, ठाणे येथील मोठ्या मॉलमध्ये जागा उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच तेथे विक्री व्यवस्था सुरू होईल. याच प्रमाणे शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला मुंबईची बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कराड कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हाच प्रयत्न होतोय याचे समाधान आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शाश्वत शेतीसाठी प्रयत्न होत आहेत. बचत गटांची चळवळ सक्रीय झाली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योगात पडल्या आहेत. त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची गुणवत्ता, दर्जा, पॅकेजिंग व मार्केटिंग याचे प्रशिक्षण महिलांना देणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या शेतकऱ्यांसह विविध संघटनांचे, युवकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. ही आंदोलने करण्याची वेळ त्यांच्यावर का आली याचा विचार होणे गरजेचे आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आणि रोजगार निर्मिती करण्यात आपण अपयशी ठरल्याने आंदोलन करण्याची वेळ जनतेवर आली आहे.
यावर्षी पाऊसकाळ कमी झाल्याने उद्भवणाऱ्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधताना आ.चव्हाण म्हणाले, या वर्षी मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. शासनाने आत्तापासूनच चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. जलसंधारणाची कामे हाती घेण्यासाठी विशेष धोरण राबवावे लागणार आहे.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, म. फुले यांनी शेतीचे महत्व जाणले. ज्वारी सारखे पीक त्यांनी विकसीत केले. पाणी आडवा पाणी जिरवा सारखे कार्यक्रम राबविले. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राचा पाया घातला. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी कृषी, साहित्य, कला, संस्कृती याचा सुरेख संगम साधला. या महापुरूषांनी महाराष्ट्रात आदर्शवत काम केले आहे.
उदयसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सामान्य जनता सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी विलास काकांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक शेती तंत्रज्ञान पोहचावे यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाची संकल्पना मांडली. आज कराडचे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरले आहे. सहकारी संस्था या समाजाच्या मालकीच्या असतात त्यात राजकारण न आणता त्या चांगल्या पध्दतीने चालण्यासाठी जनतेनेचे त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
प्रारंभी फित कापून कृषी प्रदर्शनातील स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती विजयराव कदम यांनी केले. स्वागत उपसभापती संभाजी चव्हाण, संचालक नितीन ढापरे, शंकरराव इंगवले, सर्जेराव गुरव, रेखताई पवार, गणपती पाटील, संभाजी काकडे, राजेंद्र चव्हाण, जयंतीलाल पटेल, संदीप जाधव, इंदिरा जाधव, जगन्नाथ लावंड यांनी केले. आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मानले.
यावेळी शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान जमा करा
राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून 50 हजारापर्यंतची मदत देवू केली आहे. मात्र या लाभापासून अनेक शेतकरी अद्याप वंचित आहेत. हे प्रोत्साहन अनुदान उर्वरीत शेतकऱ्यांना लवकर अदा करावे, अशी अपेक्षा आ.चव्हाण यांनी व्यक्त केली. आमचे सरकार सत्तेवर असताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती. ती नंतरच्या सरकारने बंद केली याकडेही आ.चव्हाण यांनी लक्ष वेधले.