
ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण सुद्धा केलेले आहे, शेतकऱ्याचा असूड, ब्राम्हणांचे कसब, अश्या अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले होते, “प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.“ असे म्हणणाऱ्या ज्योतीबांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणीही त्यांनी केली.