सीएससी कंपनीच्या बोगस कारभारविरोधात कराडात संगणक परिचालकांचे बेमुदत आंदोलन
कराड पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विजय विभुते यांना निवेदन

कराड ः सीएससी कंपनीकडून विनाकारण कामाचे बोगस टार्गेट देणे, संगणक परिचालांचा वेळेवर मानधन मिळत नाही यासह अनेक विविध प्र्रश्नासंदर्भात आज सातारा जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्यावतीने कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय विभूते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी परिचालक यांनी काम बंद आंदोलन करून सर्व संगणक परिचालक बेमुदत संप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ग्रामपंचायतला संगणक परिचालक सीएससी कंपनीचे व्हीएलई म्हणून गेले 11 वर्षापासून प्रमाणिकपणे काम करत आहेत. परंतु आम्हाला वेळेवर मानधन मिळत नाही, कधी कधी तीन ते चार महिन्यातून मानधन होते. ते पण 6930 इतके तुटपुंजे आहे. आमच्याकडून 40 ते 50 प्रकारची ऑनलाईन कामे करून घेतली जातात. तसेच सीएससी कंपनीकडून विनाकारण कामाचे बोगस टार्गेट दिले जात आहे. जसे की बोगस एन्ट्री मारणे, ग्रामपंचायतमध्ये गावातील लोकांची दाखल्यांची मागणी नसताना सुद्धा ते दाखले ऑनलाईन काढण्यास भाग पाडत आहे. इतर विभागाची कामे बळजबरीने करण्यास सांगत आहे. या कारणामुळे आज सातारा जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्यावतीने कराड पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तसेच खालील सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सर्व संगणक परिचालक आजपासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संगणक परिचालकांच्या मागण्या खालीलप्रमाणे ः
संगणक परिचालकांना शासन नियमाप्रमाणे कुशल कामगार म्हणून 22600 मानधन देण्यात यावे.
बोगस टार्गेट ताबडतोब बंद करणे.
दिवाळीपूर्वी दोन महिन्याचे थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे.
प्रत्येक संगणक परिचालकांना दिवाळी बोनस देण्यात यावा.
आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची संगणक परिचालकावर सक्ती करण्यात येऊ नये.
इतर विभागाची कामाची सक्ती करण्यात येऊ नये.