
कराड ः रेठरे बुद्रुक ता. कराड येथे तुला दिसत नाही का, रिक्षा बघून चालव असे म्हणाल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाने एकावर कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दिनकर महादेव थोरात (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याबाबतची फिर्याद कराड तालुका पोलिसात दिली असून याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
योगेश बाळासो मोहिते (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेठरे बुद्रुक येथील मेन चौकात फिर्यादी दिनकर थोरात हे रस्त्याचे कडेला गप्पा मारत असताना पाठीमागून रिक्षाचालक योगेश मोहिते याची रिक्षा दिनकर थोरात यांना धडकली. त्यावेळी त्यांनी तुला दिसत नाही का, रिक्षा बघून चालव असे म्हणाले असता योगेश याने दिनकर थोरात यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. दिनकर थोरात यांनी त्यास प्र्रतिकार केला असता योगेश याने रिक्षामधील ऊसतोडीचा कोयता काढून दिनकर थोरात यांच्या डोक्यात, हातावर वार करून गंभीर जखमी केले. याबाबत दिनकर थोरात यांनी कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी योगेश मोहितेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करीत आहेत.