तिसऱ्या दिवशीही लोकसभेतून आणखी दोन खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली: संसद सुरक्षा त्रुटी आणि घुसखोरीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन निवेदन द्यावे, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेतून सुमारे १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले.
गेल्या काही सलग दिवसांपासून खासदारांवर संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. खासदार निलंबनाचे सत्र तिसऱ्या दिवशीही कायम आहे. लोकसभेतून आणखी दोन खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
बुधवारी लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची नावे सी थॉमस आणि एएम अरिफ अशी आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान फलक घेऊन अध्यक्षांच्या खुर्चीसमोरील जागेत प्रवेश केल्याबद्दल या दोन खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोन खासदारांच्या निलंबनानंतर आता एकूण निलंबित खासदारांचा आकडा १४३ वर पोहोचला आहे.
राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातील खासदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आम्ही सर्व खासदार तिथेच बसलो होते, मीच तो व्हिडिओ शूट केलाय. व्हिडिओ माझ्या फोनमध्ये आहे. मीडिया फक्त हेच दाखवत आहे, पण आमच्या १५० खासदारांना निलंबित केले, त्यावर मीडियात चर्चा होत नाही. अदानींवर चर्चा नाही, राफेलवर चर्चा नाही, बेरोजगारीवर चर्चा नाही, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरात विरोधकांनी केलेल्या आंदोलनादरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. अनेकदा सभागृहात बोलण्याची संधी मला दिली जात नाही. दलित असल्यामुळे ही संधी नाकारली जाते, असे म्हटले तर चालेल का, जातीवरून समुदायाच्या भावना भडकवणे योग्य नाही. जी घटना सभागृहात घडली नाही. त्याबाबत सभागृहात प्रस्ताव पारित करणे योग्य नाही. पंतप्रधानांनी संसदेवर बहिष्कार घातला आहे का, सभागृहात येऊन विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. सभागृहात एखाद्या जातीवरून भाष्य करणे चुकीचे आहे, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.