मराठा समाज जोपर्यंत मागे फिरा म्हणणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही : मनोज जरांगे

मुंबई : सरकारने मराठा समाजाशी दगाबाजी करण्याचा विचार स्वप्नातही आणू नये. ठरल्याप्रमाणे 13 जुलैपर्यंत सगेसोयऱयांचा कायदा अमलात आणा नाहीतर पुन्हा मुंबईत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. मराठा समाज जोपर्यंत मागे फिरा म्हणणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा चौथा टप्पा स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे हे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांचे आज आंतरवाली सराटीत आगमन झाले. ठरल्याप्रमाणे सरकारने शब्द पाळला नाही तर मराठा समाजाची बैठक घेऊन विधानसभेला 288 जागा लढवायच्या की पाडायच्या याचा निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. आठ दिवसांत या विषयाचा निकाल लावा असेही जरांगे म्हणाले.
राज्य सरकारचे मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील यांची जीभ सैल सुटली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यांना शेरोशायरीशिवाय काही येत नसल्याचा टोलाही जरांगे यांनी लगावला.
मनोज जरांगे-पाटील यांची मागणी नेमकी काय आहे हेच कळत नाही. प्रत्येक आंदोलनात त्यांची वेगळी मागणी असते. ज्या मागण्या कधीच मान्य होऊ शकत नाहीत त्या मागण्या जरांगे करतात. त्यांच्या आंदोलनामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला.