राजकियराज्यसातारा

नवयुवा मतदारांच्या नाव नोंदणीसाठी नाविन्यपूर्ण कल्पनांवर भर द्या ः विभागीय आयुक्त सौरभ राव

सौरभ राव यांनी घेतला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा

सातारा : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विशेषत: नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्यादृष्टीने स्वीप कार्यक्रम, थेट महाविद्यालयांशी समन्वय आदी नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपायुक्त पुरवठा तथा सहायक मतदार यादी निरीक्षक समीक्षा चंद्राकार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार संघांचे मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 204 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘स्वीप’ उपक्रमांची व्यापक जनजागृती करण्यात यावी. मतदार संघनिहाय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करावे. मतदार जनजागृतीसाठी राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. दावे व हरकती स्वीकारण्याच्या तारखेनंतरही मतदार नोंदणी करता येते याची जनजागृती करा, असेही ते म्हणाले.

सातारा जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीची मोठी परंपरा आहे. तसेच महाबळेश्वर, पाचगणीसारख्या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील मोठे कलावंत येत असतात. कलावंत, सेलेब्रिटी, प्रसिद्ध खेळाडू यांच्याकडून मतदार नोंदणी आवाहनाचे संदेश घेऊन ते व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुग, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात प्रसारित करावेत. नीतीमूल्याधारित (एथिकल) मतदानाचा संदेश अधिकाधिक पोहेचवा. मतदार जागृतीसाठी ‘डिस्ट्रिक्ट ॲम्बेसॅडर, ‘यूथ आयकॉन’ नेमावेत, असेही ते म्हणाले.

मतदान प्रकियेत 18 ते 19 आणि 20 ते 29 या या वयोगटातील युवकांचा सहभाग वाढण्याकडे लक्ष द्या. त्यासाठी महाविद्यालयांशी समन्वय साधून अर्ज नमुना 6 भरुन घेणे, संबंधित मतदार संघाकडे पाठविणे यावर काम करा. मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करण्याची, मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्ती करण्याची प्रक्रिया संपूर्ण दक्षता घेऊन राबवावी. मतदार यादीत समाजातील सर्व घटकांचा समावेश होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त श्री. राव यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जिल्ह्यात 13 नोव्हेंबरपर्यंत 16 हजारावर तर आजपर्यंत सुमारे 20 हजारापर्यंत युवा मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी नाविण्यपूर्ण कल्पनांचा अवलंब केला असून पाटण मतदार नोंदणी अधिकारी यांनी सांगली जिल्ह्यात पुनर्वसनाने स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही केली. ग्रामीण भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा घरोघरी संपर्क असल्याने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. राव यांनी यावेळी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान प्राप्त अर्ज नमुने 6, 7, 8 आदींचा सविस्तर आढावा घेतला. मतदार नोंदणी, वगळणी, स्वीप कार्यक्रम आदी आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी सादरीकरण केले.

यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, सातारचे सुधाकर भोसले, वाईचे राजेंद्रकुमार जाधव, माणच्या उज्ज्वला गाडेकर, कराडचे अतुल म्हेत्रे, पाटण सुनील गाडे, उपमुख्य निवडणूक अधिकारी ग्रा.पं. तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना वाघमळे उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close