
कराड ः ओगलेवाडी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिन्ही फरार संशयितांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथक व डीवायएसपी पथकाने तिघांना अटक केली.
सोमनाथ सुर्यवंशी, रवीराज पळसे, आर्यन सुर्यवंशी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओगलेवाडी परिसरात देवीची वर्गणी दिली नाही या कारणावरून चिडून जाऊन सोमनाथ सुर्यवंशी, रवीराज पळसे, आर्यन सुर्यवंशी या तिघांनी अभिषेक कोरडे याच्यावर धारदार कोयत्याने वार करत व डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यापासून तिन्ही संशयित आरोपी फरार झाले होते. याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला त्यांचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डीवायएसपी यांना गोपनीय बातमी दाराकडून तिन्ही संशयितांची माहिती मिळाली. त्याआधारे डीवायएसपी पथक व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिन्ही संशयितांना ओगलेवाडी परिसरातून अटक केली. त्यामधील सोमनाथ सुर्यवंशी याच्यावर कराड शहर पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, पोलीस हवालदार प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, शशि काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, महेश शिंदे यांनी केली.