
कराड ः चार वर्षापासून खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्यात फरारी असलेल्या महिलेस कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली.
जानकी चंदु उर्फ विक्रम राठोड (वय 30, रा. कोल्हापूर नाका, कराड) अशी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खुनाचा प्र्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्यात जानकी राठोड ही चार वर्षापासून पोलिसांना चकवा देवून स्वतःचे नाव व अस्तित्व लपवून कराड शहरात राहत होती. जानकी ही रोड साइट फुटपाथवर राहणारी असल्याने तिचा कायमस्वरूपीचा पत्ता मिळत नव्हता. तसेच तिने दुसरे लग्न केल्यामुळे तिचा शोध घेणे पोलिसांसाठी कठीण झाले होते. त्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी संशयित आरोपी जानकी राठोड हिस शोधून अटक करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना दिल्या होत्या. त्यानुसार राजू डांगे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की जानकी राठोड ही कराडातच वावरत आहे. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून तिला अटक केली.
सदरची कारवाई कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, मनिषा कांबळे यांनी केली.
सहा महिन्यात आठ फरार आरोपी अटक
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या गुन्ह्यातील फरार आरोपी यांची पोलीस रेकॉर्डवर नसलेली माहिती प्राप्त करून वर्षान वर्ष फरार आरोपी पकडणे जिकीरीचे असताना देखील कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व त्यांच्या टीमने मागील सहा महिन्यात 11 गुन्ह्यातील आठ फरार आरोपींना अटक केली.