
कराड, ः विजय दिवस समारोह समितीच्यावतीने देण्यात येणारा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांना छत्रपती शाहू महाराज, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पालिकेच्यावतीने लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांना मानपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले. वीरपत्नी श्रीमती पूजा उकलीकर यांचा तर आदर्श माता भाग्यश्री कुलकर्णी-प्रभुणे (धुळे) यांनाही सन्मानीत करण्यात आले.
विजय दिवसचे संस्थापक कर्नल संभाजीराव पाटील, सौ. पुष्पा पाटील, कॅप्टन अशोक महाडकर, लेफ्टनंट कर्नल विना खांडेकर, विनायक विभुते, सचीव ॲड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, डॉ. स्नेहल राजहंस, मीनल ढापरे, प्राचार्य गणपतराव कणसे, सलीम मुजावर, महालिंग मुंढेकर, ॲड. परवेज सुतार, प्रा. बी. एस. खोत, रत्नाकर शानभाग, सतीश बेडके, सतीश उपळावीकर, श्री. अपिने, रमेश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ॲड. खलप म्हणाले, गोव्यावर पोर्तुगीजांनी 450 वर्षे राज्य केले. घनघोर लढाई, युद्ध झाले. अमेरिका, इंग्लंड व अन्य देश गोव्यामध्ये पोर्तुगीज सेना हाकलून लावण्यासाठी भारतीय सैन्याने प्रवेश करू नये यासाठी दडपण आणत होते. मात्र 19 डिसेंबर 1961 साली भारतीय सैन्य ज्यावेळी गोव्यात आले. त्यावेळी गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले. त्यामुळे विजय दिवस समारोह समितीच्यावतीने देण्यात येणारा जीवन गौरव यशवंत पुरस्कार हा भारतीय सैन्य दलाला, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, महिला व गोमंतक वासियांनाही समर्पित करत असल्याचे सांगितले. कर्नल पाटील यांनी विजय दिवस समारोहाचा ट्रेंड यावर्षीपासून बदलत असल्याचे सांगून यापुढे तरुणांसाठी शिक्षण, नोकरी व अन्य प्लॅटफॉर्म विजय दिवसच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले. ॲड. संभाजीराव मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. खोत, प्रा. घाटगे, विलास जाधव यांनी मानपत्र वाचन केले. विनायक विभुते यांनी आभार मानले.
‘लोकोत्तर लोकराजा’चे प्रकाशन
विजय दिवस समारोह समितीचे सचीव ॲड. संभाजीराव मोहिते यांनी लोकोत्तर लोकराजा या छत्रपती शाहु महाराजांवर राज्यभर व्याख्याने दिली. त्या व्याख्यांनांचे संकलन करुन त्याचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती शाहू महाराज, चंद्रकांत दळवी, कर्नल संभाजीराव पाटील, लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.