
कराड ः ओगलेवाडी येथील संगम बार मालकाला पाच हजार रूपयेची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या फाळकुट दादाच्या कराड शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतची फिर्याद संगम बारचे मॅनेजर शंकर बबन साळुंखे रा. राजारामनगर, हजारमाची ता. कराड यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
बाळू प्रकाश सुर्यवंशी रा. गणपती मंदिराजवळ ओगलेवाडी, ता. कराड असे अटक केलेल्या फाळकुट दादाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओगलेवाडी येथे संगम बिअर बार आहे. तेथे फिर्यादी मँनेजर म्हणून आहेत. रविवारी रात्री साडे नऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान बाळू सुर्यवंशी याने मॅनेजर शंकर साळुंखे यास माझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत माहिती आहे ना तुम्हाला, जर बारचा धंदा करायचा असेल तर मला महिन्याला पाच हजार रूपये द्यावे लागतील तसेच मी ज्यावेळेस बारमध्ये येईल त्यावेळी मला फुकट दारू द्यावी लागेल, नाहीतर मी तोडफोड करून तुमचा बार बंद करेन, मला वेळ लागणार नाही तुम्हाला मारायला अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्र्रकरणी बार मॅनेजर शंकर साळुंखे यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बाळू सुर्यवंशी याला बारा तासाच्या आत ताब्यात घेऊन अटक केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी करीत आहेत.