गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक
कराड शहर गुन्हे प्र्रकटीकरण शाखेची कामगिरी ः दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड ः करवडी फाटा ता. कराड येथे गावठी पिस्टल विक्रीकरता आलेल्या एकास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या दोन गावठी बनावटीची पिस्टल व एक दुचाकी असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दादा पटेल उर्फ युसुफ दिलावर पटेल (वय 45, रा. वाघेरी, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर व परिसरातील अवैध शस्त्रे शोधून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पाटणचे डीवायएसपी विवेक लावंड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना सूचना दिल्या होत्या. राजू डांगे यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, करवडी फाटा येथे एकजण गावठी पिस्टल बाळगून चोरटी विक्री करण्याच्या इराद्याने थांबला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह करवडी फाटा येथे सापळा रचून छापा टाकला असता दादा पटेल हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला झडप घालून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे वजा पिस्टल व एक दुचाकी असा सुमारे दोन लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राज पवार करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पाटणचे डीवायएसपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांचे मार्गर्दशनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली.
सातारा जिल्हा पोलिसांनी एका वर्षात 70 अवैध शस्त्रे, 168 जिवंत काडतुसे व 377 पुंगळ्या जप्त केल्या असून परराज्यातील तसेच स्थानिक तस्करांचे जाळे नेस्तनाभूत करण्यात यश मिळविले आहे. तसेच कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने चार महिन्याच्या कालावधीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरूद्ध सहा कारवाया केल्या असून त्यामध्ये सहा अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.