राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वारकऱ्यांची मदत घेणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मलंगगड : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वारकऱ्यांची मदत घेणार आहे. तशा प्रकारचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला उपस्थिती लावली. शेतकरी आत्महत्या करत असलेल्या भागात हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्या असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना दिला आहे.
2 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती लावली. या महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी अश्व रिंगण पार पडले त्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले होते. भव्य अश्व रिंगण सोहळा हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते. यावेळी रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्तीची जी तुमची भावना आहे ती पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आश्वासन दिले. तसेच वारकऱ्यांना त्यांनी विनंती केली की राज्यात वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधन करतो. मात्र, ज्या भागात शेतकरी आत्महत्या करत आहे. तिथे असे हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्यावे अशी विनंती यावेळी भाषणातून त्यांनी केली.