अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज आझाद मैदानावर सरकारविरोधात एल्गार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या विरोधात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्यांनी सुरू केलेल्या संपाला एक महिना पूर्ण होत आहे. संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीने बुधवारी (दि.3) सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय कर्मचार्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, महागाई व अन्य भत्ते, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, मासिक पेन्शन तसेच दरम्यानच्या कालावधीत महागाई निर्देशांकाला जोडलेले किमान वेतनाइतके मानधन व मासिक पेन्शन या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरात अंगणवाडी कर्मचार्यांनी सातत्याने सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलने केली. संपाच्या दुसर्या दिवशी महिला व बालविकास मंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. याबाबत आश्वासन देण्यात आले.
त्या पलीकडे शासनाने अजूनही या संपाची दखल घेऊन मागण्यांबाबत वाटाघाटी करून संपावर ठोस तोडगा काढलेला नसल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईमध्ये पहिल्या दिवशी तोडगा न निघाल्यास या मोर्चाचे रुपांतर बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार आहे.