तुमच्यासारख्या चायनिज मॉडेल हिंदुंची हिंदू धर्माला गरज नाही
भाजप आमदार नितेश राणेंचा उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबई : ज्यांनी रामाच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यांना राम मंदिराचं श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखं आहे, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणेंनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांवर केला आहे.
राम मंदिराचे श्रेय काँग्रेसला देणाऱ्या राऊतांना राणेंनी खडेबोल सुनावले आहे.
नितेश राणे म्हणाले की, “ज्या काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत प्रत्येक क्षणाला राम मंदिराचा विरोध केला. ज्यांनी रामाच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यांना राम मंदिराचं श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखं आहे. जे आमच्या देवी-देवतांच्या अस्तित्वाला प्रश्न निर्माण करतात त्यांना तुम्ही राम मंदिराचं श्रेय देत असाल तर तुमच्यासारख्या चायनिज मॉडेल हिंदुंची हिंदू धर्माला गरज नाही. त्यापेक्षा अधिकृत काँग्रेसच्या सेवादलची टोपी घाला आणि राहूल गांधी आणि सोनिया गांधींसमोर सलाम ठोकण्यासाठी उभे रहा.”
“१० जनपथचे अधिकृत पगारी नोकर संजय राऊत आणि त्यांचे मालक यांनी महायुतीच्या आमच्या नेत्यांना दिल्लीच्या ताटाखालचं मांजर बोलणं हा २०२४ चा मोठा जोक आहे. सकाळी चहा प्यायचा की, कॉफी प्यायची हे दिल्ली आणि १० जनपथच्या आदेशाशिवाय जे करत नाही त्यांनी दुसऱ्यांवर बोट ठेवणं ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे,” असेही ते म्हणाले.
तसेच काँग्रेस आपल्या यात्रेत व्यस्त असल्याने उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी फोन करुन जुळवाजुळव करत आहेत. याचाच अर्थ १० जनपथमध्ये दोन कारकून नेमल्याचे दिसत आहे, असा टोलाही राणेंनी लगावला. महानंदा डेअरी बाबत अफवा पसरवन्याचे काम बेबी पेंग्विन आणि राऊत करत आहे. पण ना पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला आणि ना महानंदाबाबत अशी काही चर्चा आहे. तुम्हाला अदानी समुह चालत नाही पण तुमच्या मालकाला आणि आदित्य ठाकरेंना अमराठी लोकं चालतात, असे ते म्हणाले. तसेच आता विकासाची जबाबदारी महायुतीच्या सरकारवर आहे. वर्षानुवर्षे उद्धव ठाकरे जो मुंबईचा विकास करु शकले नाहीत तो विकास आमचं महायुतीचं सरकार करुन दाखवेल, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला.