
कराड : महाराष्ट्र सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा व यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट, वडगांव (उंब्रज) यांच्या वतीने आयोजित सैनिक व पोलीस शहीद परिवार सन्मान सोहळा व संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सैनिक समाज यशवंत पुरस्कार प्रदान करण्यासाठी उपस्थित राहिलेले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कराडचे तहसीलदार विजय पवार यांनी शहीद सैनिक परिवारासाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले आणि माझ्या जिल्ह्यात विजय पवार यांच्या सारखे संवेदनशील सक्षम तहसीलदार लाभले आहेत. त्यांच्या प्रेरणेने इतर तालुक्यातही सैनिक परिवारासाठी भरीव कार्य हाती घेता येईल. असे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
त्याच दरम्यान शहिद जवानांच्या वीर मातांचा सन्मान करते वेळी वीर मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सभागृहातील प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पानावल्या आणि तहसीलदार विजय पवार यांनाही अश्रू अनावर झाले. आणि मग सगळा सोहळा भावुक झाला आणि एका भावनिक उंचीवर पोहचला.विजय पवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी शरद गाडे, मंजिरी खुस्पे, मेजर आनंद पाथरकर, प्रवीण माळी, सत्वशील कदम, दिपक खडंग, रामकृष्ण वेताळ, दिनकर थोरात, राजू शेळके आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, माजी आमदार आनंदराव पाटील, कर्नल नितीन शिंगारे, काकासाहेब जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. हणमंतराव कराळे यांनी केले.