शरद मोहोळ हत्याप्रकरणी विठ्ठल शेलार व वाघ्या मारणेसह आणखी दहा जण ताब्यात

पुणे : शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. शरद मोहोळ याची हत्या कोणत्या वादातून नाहीतर टोळीयुद्धातूनच झाल्याची दाट शक्यता आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह दहा जणांंना पनवेल येथून ताब्यात घेतलं आहे.
गुन्हे शाखेने ही कारवाई करताना पनवेल पोलिसांची मदत घेतली. विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्यात याआधी चकमक पाहायला मिळाली होती. दोघांच्या टोळीयुद्धाने अनेकदा पुण्यात मुळशी पॅटर्न पाहायला मिळाला होता.
विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ टोळीमध्ये अनेकदा खटके उडालेले होते. मागे एकदा म्हाळुंगे इथल्या राधा चौकामध्ये दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी मोहोळ याच्या टोळीने शेलारवर हल्ला केला होता. मात्र शेलार याने तिथून पळ काढला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं होतं. कदाचित या भांडणानंतर मोहोळ याला संपवण्यासाठी विठ्ठल शेलार याने प्लॅन केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शरद मोहोळ याचा खून झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी शेलार याला चौकशीसाठी बोलावलं होत. शेलार चौकशीसाठी गेला होता त्यानंतर तपासामध्ये काही गोष्टी समोर आल्या. ज्याचे धागेदोरे पोलिसांना लागले आणि गुन्हे शाखेने विठ्ठल शेलारला अटक केली. पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे याला अटक केली आहे. आता पोलीस तपासात सर्व काही उघड होणार आहे. एकंदरित जर शेलार याने हा प्लॅन केलेला असेल तर मोहोळचा खून हा टोळीयुद्धातूनच झाला असावा. पोलीस तपासात या हत्येची आणखी माहिती लवकरच समोर येईल.