ताज्या बातम्याराजकियराज्य

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ?

मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू झाली असून, शनिवारी पार पडलेल्या सुनावणीत नवीन वेळापत्रक ठरविण्यात आले. यानुसार सर्वोच्च न्यायालयाकडे अंतिम निकालासाठी वेळ मागण्यात येणार आहे.
हा अतिरिक्त कालावधी १० ते १५ दिवसांचा असल्याने या सुनावणीचा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या दुसऱ्या दिवसाची सुनावणी अवघ्या अर्ध्या तासात संपली. अजित पवार गटाकडून ऐनवेळी काही कागदपत्रे सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे शरद पवार गटाकडील कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आला. याला शरद पवार गटाच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला. मात्र, शनिवारी होणारी आमदार जयंत पाटील यांची उलटतपासणी पुढे ढकलण्यात आली. नवीन वेळापत्रक जारी करण्यात आले असून, यानुसार २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

सुनावणीत काय घडले?
अनिल पाटील यांच्याविरोधात आमच्याकडे काही नवीन कागदपत्रे आहेत, ती आम्ही सुनावणीदरम्यान सादर करू, अशी माहिती शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांना दिली.

सुनावणीचे नवीन वेळापत्रक
२३, २४ जानेवारीला उर्वरित ४ जणांची उलट तपासणी
२५ जानेवारीला अन्य दोन साक्षीदारांची उलट तपासणी

कागदपत्रे सादर करण्यासाठी तीन दिवसांचा वेळ
२९ जानेवारीला दोन्ही गटांचे लेखी सादरीकरण
३० जानेवारीला अंतिम युक्तिवाद होणार
३१ जानेवारीला सुनावणी संपवण्यात येईल.
पुढील ८-१० दिवसांत अंतिम निकाल

शरद पवार हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवायचे; दुसऱ्या गटाचे आरोप
अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे. ते कुठल्याही नेत्याचे ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचेच ऐकायचे. शरद पवार यांनी पक्षाची घटना पायदळी तुडवली, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

३० जानेवारीपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीही लांबणीवर
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे होऊ घातलेली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरुद्ध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणाची सुनावणी ३० जानेवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे. ती लांबणीवर पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे नार्वेकर यांना आवश्यकता वाटल्यास त्यांचे वकील सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांच्या माध्यमातून मुदतवाढीसाठी विनंती करता येईल.

शिवसेना आमदार अपात्रता सोमवारी सुनावणीची शक्यता
दरम्यान, सोमवारी (दि. २२) अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अद्याप सुटी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सुनावणी ठरल्यानुसार होण्याची शक्यता आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close