
कराड : कराड शहर व परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन लाखाच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
नितीन तुकाराम बसनुर (वय 26 ) रा. येणपे, ता. कराड व विजय संजय डुबल ( वय 23 ) रा. कडेगाव, जि. सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन लाखाच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील बसस्थानक परिसरातून कृणाल जाधव यांची दुचाकी परवा चोरीस गेली होती. त्याचा गुन्हा पोलिसात दाखल होता. त्याचा तपास करण्याचे आदेश पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी डीबी पथकास दिले होतेे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पीएसआय पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचा तपास सुरू करण्यात आला. चोरीस गेलेले वाहन व चोरटे भेदा चौकात आहेत, अशी माहिती मिळताच पतंग पाटील व डीबी पथक तेथे रवाना झाले. तेथे वरील दोघांना स्पेल्डरसहीत ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे असलेली दुचाकी चीरीची असल्याचे समोर आले. त्यांनीही ती दुचाकी बस स्थानक परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्यासोबतच त्यांनी आणखी दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकीत एक लाखांच्य केटीएम व अन्य एका दुचाकीचा समावेश आहे.