
कराड : शेतकऱ्यांना देण्यासाठी आणलेले दुधाच्या बिलाचे तब्बल तीन लाख 65 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. भैरवनाथ नगर, काले येथे गुरुवारी सकाळी अकरा वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी दूध डेअरी मालक संतोष अरविंद खटावकर रा. भैरवनाथ नगर, काले यांनी कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष खटावकर यांची भैरवनाथ नगर येथे श्रीराम दूध डेअरी आहे. दूध संकलन झालेल्या शेतकऱ्यांना ते प्रत्येक महिन्याच्या 5, 15 व 25 तारखेला दूध बिलाचे पैसे देत असतात. दिनांक 23 रोजी त्यांनी शेतकऱ्यांना दुधाच्या बिलाचे पैसे देण्यासाठी तीन लाख 80 हजार रुपये काढून ते डेअरी जवळील घरात कपाटातील ड्रॉवरमध्ये सायंकाळी पाच वाजता ठेवली. त्यानंतर दूध डेअरी मधील दैनंदिन कामकाज करून रात्री अकरा वाजता त्यांनी दूध डेरी बंद केली. दिनांक 24 रोजी सकाळी त्यांनी दूध डेअरी उघडून कामगार आल्यानंतर दुपारी घरच्यांना घेऊन ते देवदर्शनासाठी गेले. जाताना कपाटातील ड्रावर मधून पंधरा हजार रुपये घेतले व ड्रावर मध्ये तीन लाख 65 हजार रुपये ठेवले. त्या ड्रॉवरला कुलूप घालून त्याची चावी कपाटातील खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवली. खटावकर यांचे वडील डेअरीमध्ये कामगारांसोबत होते. देवदर्शन करून परतल्यानंतर रात्री अकरा वाजता ते घरी गेले. त्यावेळी वडील व कामगारांनी डेअरी बंद केली. दिनांक 25 रोजी सकाळी सात वाजता खटावकर यांनी डेअरी उघडली. शेतकऱ्यांचे दुधाचे बिलाचे पैसे द्यायचे असल्याने त्यांनी पत्नी जयश्री यांना सकाळी अकरा वाजता दूध डेअरी जवळील घरातून कपाटात ठेवलेले पैसे आणण्यासाठी सांगितले. त्यांच्या पत्नीने कपाटात उघडून ड्रावर पाहिला असता त्यामध्ये पैसे नव्हते व ड्रावर उघडाच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी कपाटामध्ये असलेले तीन लाख पासष्ट हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली असल्याची खात्री झाल्याने पोलिसात फिर्याद दिली.