
कराड : छेडछाडप्रकरणी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेला दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी एकावर कराडच्या पोलीस उपअधिक्षक कार्यालयातील निर्भया पथकाने कारवाई केली. मलकापुरच्या लाहोटीनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापुरच्या लाहोटीनगर परिसरात एका विवाहित महिलेस त्याच परिसरातील संशयीत त्रास देत होता. पिडीत महिलेची छेडछाड करून दमदाटी करत होता. हा प्रकार संबंधित महिलेने पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील निर्भया पथकास कळवला. उपअधिक्षक ठाकूर यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत संशयितावर कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार संशयीतावर गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यानंतर काही दिवसातच संशयित पिडीत महिलेस दमदाटी, शिवीगाळ करून गुन्हा मागे घेण्यासाठी दमदाटी करू लागला. हा प्रकार समजताच उपअधिक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अमित बाबर, दीपा पाटील, संतोष सपाटे, सागर बर्गे, प्रविण पवार, दिपक कोळी, अमोल फल्ले यांच्यासह उपविभागीय पोलीस पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळत त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल केला. निर्भया पथकाच्या दिपा पाटील यांनी यापुढे असे कोण महिला, मुलींना त्रास देत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.