अमेरिकेकडून सीरिया आणि इराकमधील इराण समर्थित मिलिशियाच्या स्थानांवर हवाई हल्ला

नवी दिल्ली : जॉर्डनमधील लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या सैन्याने शुक्रवारी सीरिया आणि इराकमधील इराण समर्थित मिलिशियाच्या स्थानांवर हवाई हल्ला केला.
यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. अमेरिकन सैन्याने एका निवेदनातून ही माहिती दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीरियामध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मिलिशियाचे ६ सैनिक मारले गेले आहेत. यातील तिघे गैर-सिरियन होते. या हल्ल्यामुळे अमेरिका सीरिया आणि इराण यांच्यातील वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यात ३ अमेरिकन सैनिक ठार झाले होते. तर सुमारे ४० जण जखमी झाले होते. या घटनेवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन संताप व्यक्त केला होता. हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर दिल जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी हवाई हल्ल्यांमध्ये कमांड आणि कंट्रोल सेंटर, रॉकेट, क्षेपणास्त्र आणि ड्रोन स्टोरेज सुविधा तसेच लॉजिस्टिक आणि दारूगोळा पुरवठा साखळी सुविधांना लक्ष्य करण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकन सैन्याने सीरिया आणि इराणमधील ८५ हून अधिक लक्ष्यांवर १२५ हून अधिक युद्ध सामग्रीसह हल्ले केले. त्याच वेळी, सीरियाच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, सीरियाच्या वाळवंटी भागात आणि इराकच्या सीमेजवळ असलेल्या लक्ष्यांवर अमेरिकन हल्ल्यात अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत.