
मुंबई : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पोलिस; तसेच प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. राज्यातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या, विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्व जिल्ह्यांत पोलिसांच्या सायबर सेलने सोशल मीडियावर देखरेख ठेवून पाकिस्तानला मदत करणाऱ्या हँडलवर कारवाई करावी, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतल्यानंतर, पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून सीमाभागात गोळीबार सुरू झाला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांची शक्यता लक्षात घेऊन, केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर, फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल करा, वॉर रूम स्थापित करा, ब्लॅकआउटवेळी रुग्णालयांसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे/काचा वापरून बाहेरून प्रकाश दिसणार नाही, अशी व्यवस्था करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ब्लॅकआऊट म्हणजे काय, अशा वेळी काय करावे याचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवून व्यापक जनजागृती करा, केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’चे सखोल अध्ययन करून सर्वांना माहिती द्या, अशी सूचना फडणवीस यांनी केली.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी आजच देण्यात येणार असून, ज्यातून तातडीच्या साहित्याची खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त, या संदर्भातील महत्त्वाचे प्रस्ताव एका तासात मंजूर करा, मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिकांची बैठक घेऊन, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा, यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या, असे फडणवीस यांनी सांगितले.
पोलिसांनी नेहमीपेक्षा अधिक जागरूकता ठेवा, देशद्रोही कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोम्बिंग ऑपरेशन करा, गस्त चोख ठेवा. सागरी सुरक्षेसाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर भाड्याने घ्या, सरकार, सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याची तिन्ही दले; तसेच तटरक्षक दलाच्या प्रमुखांना पुढील बैठकीत निमंत्रित करा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.
या बैठकीला प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.