
कराड : कराड तालुक्यातील काही क्रेशर धारकांना काल तहसील कार्यालयामध्ये बोलावण्यात आले होते अशी कुजबूज कराड तहसील कार्यालयात सुरू होती. त्यांच्याकडून क्रेशर बाबत सर्व परवानग्या व कागदपत्रे आहेत की नाहीत याची खात्री करण्यासाठी की अजून कोणत्या कारणासाठी बोलवण्यात आले होते. याबाबत उलट सुलट चर्चा तहसील आवारामध्ये सुरू आहेत.
मुळात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ज्या पद्धतीने डी पी जैन या कंपनीला तहसील कार्यालयातून दंड करण्यात आला. त्याच पद्धतीने अधिकाऱ्यांनी तालुक्यातील अनधिकृत पणे चालू असलेल्या क्रेशरची कागदपत्रे तपासणी करून तसेच ज्या ठिकाणी उत्खनन करण्याची परवानगी घेतलेली आहे परवानगी पेक्षा जादाचे उत्खनन केले असल्यास त्याची ईटीएस मोजणी करून त्यांच्यावरती कारवाई केल्यास अनाधिकृतपणे चालू असलेले व्यवसाय बंद होतील व प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांना याचा फायदा होईल व या धडक कारवाईमुळे महसूल खात्यास उत्पन्न वाढीस मदत होईल असे प्रामाणिक व्यवसाय धारकांच्या मध्ये व नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
एक ते दीड महिन्यांमध्ये गौण खनिज उत्खनन करण्यासाठी किती परवानगी देण्यात आलेल्या आहेत. व किती उत्खनन चालू आहे हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी थोडा वेळ काढावा व तालुक्यातून ठिकठिकाणी उत्खनन चालू असलेल्या ठिकाणच्या तपासण्या करून त्याबाबत चुकीच्या पद्धतीने उत्खनन चालू असल्यास त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई कराव्या अन्यथा यामध्ये प्रामाणिक व्यवसाय धारक उपाशी व महसुली अधिकारी तुपाशी असेच म्हणण्याची वेळ तालुक्यावरती येऊ नये म्हणजे झाले.