
कराड : बालकांसाठी बालस्नेही पोलिस ठाण्यांची स्थापना चांगील गोष्टा आहे. मात्र केवळ कामे होवून उपयोग नाही. प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वर्तनातही बदल अपेक्षीत आहेत, तरच खऱ्या अर्थाने बालस्नेही पोलिस ठाण्याचा प्रयत्न सफल होईल, असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केले.
पुण्याच्या निर्माण संस्था व जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील पहिले बालस्नेही पोलिस ठाण्याची स्थापना कराड शहर पोलिस ठाण्यात झाली. त्याचे उद्घाटन सुनील फुलारी यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल, पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पाटण पोलिस उपाधीक्षका सीमा गर्जे, पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना सुनील फुलारी म्हणाले, बालकांसंबधीच्या अनेक कायद्यांचा अभ्यास पोलिसांना नसतो. बालकांना पोलिस ठाण्यात आणू नये, असा कायदा असताना दोन बालकांना त्यांच्या पालकांसह पोलिस ठाण्यात आणल्याबद्दल दोन पोलिसांना निलंबीत करण्याची वेळ आली होती. त्यामुळे त्या कायद्याची व त्यासंबधीची सर्व माहिती पोलिसांनीही घ्यावी. बालस्नेही पोलिस ठाण्याची संकल्पना रूजण्यासाठी पोलिसांनी त्याबाबत व्यापक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी पोलिसांना त्यांच्या वर्तनात बदल कारवे लागतील, त्यासह बालकासंबधीच्या काही गुन्ह्यांची माहिती व त्या संबधीच्या कारवायाच्या अन्य कार्यावाहीची माहिती होण्यासाठी त्यांचे प्रशिक्षणही घ्यावे लागेल, त्यासाठी व्यापक प्रयत्न पोलिस खात्यातर्फे केले जातील. पोलिसांची नको असलेली प्रतिमा बालकांसमोर उभी केली जाते, ती संपली पाहिजे, त्यासाठीही समाजातील जबाबदार घटकांनी पुढे आले पाहिजे. पोलिस खाते व समाज यांच्या संयुक्तीक व सकारात्मक प्रयत्नानंतरच खऱ्या अर्थाने बालस्नेही पोलिस ठाण्याची कल्पना प्रत्यक्षात येईल, त्यासाठी पोलिस दल पूर्ण ताकदीने व सकारात्मकतेने काम करेल, असा माझा विश्वास आहे. यावेळी पोलिस अधीक्षक शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बालस्नेही पोलिस ठाण्यांची संकल्पना काय आहे, याबाबतच्या पुस्तिकेचे प्रकाशन सुनील फुलारी, समीर शेख, श्रीमती दलाल यांच्या उपस्थितीत झाले. वैशाली भांडवलकर यांनी प्रास्ताविक केले. पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी स्वागत केले. पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी आभार मानले.