
कराड ः येथील जुन्या कोयना पुलाखालील नदीपात्रात सुमारे ३५ ते ४० वर्षीय पुरूषाचा मृतदेह काल सायंकाळी आढळला. मृतदेहाच्या गळ्यावर वार केल्यासारख्या खुना असुन त्याला पाईपला बांधुन नदीपात्रात टाकल्याचे तपासात दिसुन आले आहे. त्याचा विचार करुन हा खुन असावा असा अंदाज बांधुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. तपासासाठी चार पोलिस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी आज दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोयना धरणातून पाणी सोडल्याने नदीपात्रात पाणी जास्त होते. काल नदीपात्रातील पाणी कमी झाल्यावर येथील जुन्या कोयना पुलाच्या खालील नदीपात्रात एका पुरूषाचा मृतदेह वाहनधारकांना दिसला. त्यामुळे पुलावर गर्दी झाली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, अर्जुन चोरगे, अमित पवार, शशिकांत काळे, कुलदीप कोळी यांच्यासह पोलीस यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत तपास सुरू केला. मृतदेहाच्या गळ्यावर वार झाल्यासारख्या खुना दिसत आहेत. त्याचबरोबर त्याला लोखंडी पाईपला बांधुन नदीपात्रात टाकल्याचे दिसुन आले आहे. संबंधिताच्या हातावर ३/३ अशी अक्षरे लिहून गोंदलेले आहे. त्यामुळे हा खून असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तपासासाठी पोलिसांची चार पथके मुंबई परिसराताल वाशी, कळंबोली, कर्नाटकात व कोकणात रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्याचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगीतले. दरम्यान पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर यांनी आज त्यांच्या कार्यालयात सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेवुन या तपासासंदर्भात सुचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे.