फडणवीसांना खुमखुमी असेल तर त्यांनी समोर यावे
मनोज जरांगे पाटलांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

जालना : मराठा आरक्षणाचा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मराठा आंदोलना दरम्यान प्रथमच मनोज जरांगे पाटील यांनी सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस कोणाला मोठे होऊ देत नाही. पक्षातील अनेक लोकांना त्यांनी संपवले. महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे. कोणाच्या आडून हल्ले करु नये, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल.
छत्रपती समोर बसून सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी केवळ समाजाचा आहे. समाज माझा देव आहे आणि माझी समाजावर निष्ठा आहे. कुणी तरी मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे. छगन भुजबळ यांना फडवणीस यांच्यामुळे अजित पवार यांच्याकडे जावे लागले.