
कराड ः येथील बुधवार पेठ प्रभात टॉकीजसमोर एका गुंडाने एकाच्या खिशातील दोन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेऊन त्यास जीवे मारण्याची धमकी देत फायटरने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याबाबतची फिर्याद जमीर मलिक फकीर (वय 29, रा. राजयोगनगर, हजारमाची, ता. कराड) याने कराड शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी एका गुंडासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पद्या दिपक सोळवंडे, व त्याचे दोन साथीदार (नावे समजू शकले नाहीत.) असे गुन्हा नोंद झालेल्या गुंडाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जमीर हा त्याच्या पत्नीसोबत प्रभात टॉकीज समोरील रस्त्याने जात असताना शुक्रवारी रात्री पवन याने आमच्या एरियामध्ये आरडओरडा करायचा नाही, असे म्हणून जमीरच्या पत्नीच्या कानाखाली मारली. त्यावेळी जमीर त्याला अडविण्यासाठी गेला असता पवन याने भाईला बोलवतो म्हणून पद्या सोळवंडे यास बोलवले. पद्याने आल्यानंतर जमीर यास तुला माहित नाही का, मी या एरियाचा भाई आहे, येथे बाहेरून येऊन दादागिरी करायची नाही, तुला माहित नाही का जेलमध्ये माझी काय हवा होती. या एरियात फक्त पद्या भाईचीच चालते, तुला सांगून पण कळत नाही, तुला मस्ती आली आहे का असे म्हणून पद्याने त्याच्या खिशातील फायटरने जमीरला मारून जखमी केले. त्यावेळी त्याठिकाणी पद्याचे दोन साथीदार तेथे आले व त्यानीही जमीर यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. व जमीरच्या खिशातील दोन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेऊन पुन्हा या एरियात दिसायचे नाही अशी धमकी दिली. याबाबत जमीर फकीर याने शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी पद्या सोळवंडे व त्याच्या दोन साथीदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.