महाराष्ट्र काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता माझ्या आईसमोर रडला : राहुल गांधी

मुंबई : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख न करता मोठा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्र काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता माझ्या आईसमोर रडला.
सोनियाजी, मला तुरूंगात जायचं नाही, असे सांगत होता, असे राहुल गांधी सभेत म्हणाले.
भारत जोडो न्याय यात्रेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “आम्ही एका व्यक्तीविरुद्ध लढत नाहीये. आम्ही भाजपविरोधातही लढत नाहीये. एका व्यक्तीचा चेहरा बनवून समोर ठेवला आहे. हिंदू धर्मात शक्ती शब्द आहे. आम्ही एका शक्तीविरोधात लढतोय. आता प्रश्न आहे की, ती शक्ती काय आहे.”
राहुल गांधी पुढे म्हणाल की, “आता कुणीतरी बोललं की राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. देशातील प्रत्येक संस्थेत आहेत. ईडी, सीबीआयमध्ये आहे.”
“याच राज्याचा एक वरिष्ठ नेता काँग्रेस पक्षाला सोडतात आणि माझ्या आईला रडून सांगतात की, सोनियाजी मला लाज वाटतेय की, माझ्यात या लोकाशी, या शक्तीशी लढण्याची हिंमत नाहीये. मला तुरुंगात जायचे नाही”, अशी पडद्यामागची गोष्ट राहुल गांधींनी सभेत सांगितली.
यालाच जोडून ते पुढे म्हणाले की, “आणि हे एक नाहीत. असे हजारो लोक आहेत, ज्यांना घाबरवले गेले आहे. तुम्हाला काय वाटतंय की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असेच गेले. नाही, ज्या शक्तीबद्दल मी बोलतोय, त्या शक्तीने त्यांना भाजपकडे नेले आहे. ते सगळे घाबरून गेले आहेत, असा हल्ला राहुल गांधींनी भाजपवर केला.