ताज्या बातम्याराजकियराज्य

वंचितच्या महाविकास आघाडीतील प्रवेशावर आज होवू शकतो शिक्कामोर्तब?

महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : महाविकास आघाडीतही जागावाटपाबाबतच्या चर्चांनी वेग धरला असून, मुंबईत मंगळवारपासून सुरू झालेली विविध पातळ्यांवरील चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना बुधवारी भेटण्याचा निरोप दिला असून, वंचितच्या महाविकास आघाडीतील प्रवेशावर बुधवारीच शिक्कामोर्तब होऊ शकते.

लोकसभेच्या 12 जागांवर शरद पवार गटाने दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 17, तर काँग्रेसने 20 जागांचा आग्रह धरला आहे. जागावाटपाचा हा वाद अधिक चिघळू नये, यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी ‘सिल्व्हर ओक’वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दीड तास चाललेल्या या बैठकीत काही मतदारसंघांसाठी अडलेले जागावाटप आणि वंचितच्या भूमिकेसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. वंचितला सोबत घेण्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघेही आग्रही असल्याने नेमक्या किती जागा त्यांना सोडता येतील, याची चाचपणी ‘सिल्व्हर ओक’वरील बैठकीत करण्यात आली. सर्व 48 जागांचे वाटप लवकरात लवकर करणे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभांचे नियोजन यावर विस्तृत चर्चा या बैठकीत झाल्याचे समजते.

बुधवारी (दि. 6) महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शपा) शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेना (उबाठा) चे उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सहभागी होतील. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्याचा प्रयत्न या बैठकीत होईल. त्यासोबतच वंचितबद्दलचेही चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

वंचितला सहा ते आठ जागा देण्याचा विचार महाविकास आघाडीत सुरू आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून प्रत्येकी दोन जागा सोडाव्यात. याशिवाय इतर छोट्या घटकपक्षांना सामावून घ्यायचे झाल्यास संबंधित पक्षांनी त्यांना सामावून घ्यावे, असेही सूत्र ठरविले जाणार आहे. शरद पवार गट वंचितला दोन जागा सोडण्यासोबतच राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना सोबत घेण्याची चाचपणी करत आहे.

6 ते 8 जागांवर तडजोडीसाठी आंबेडकरांनीही मानसिक तयारी केली असल्याचेही ‘मविआ’तील सूत्रांनी सांगितले. वंचितला मिळालेल्या जागांपैकी किमान काही जागा या काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या मतदारसंघांत मजबूत आहेत त्या मतदारसंघांच्या असाव्यात, अशी भूमिका वंचितची आहे. ज्या जागा काँग्रेस वा राष्ट्रवादी जिंकूच शकत नाही, अशा कमजोर जागा आमच्या माथी मारू नका, असेही वंचिततर्फे स्पष्टपणे तिन्ही पक्षांना सांगण्यात आले आहे.

भाजपच्या नेतृत्वातील आघाडीचा निर्णायक पराभव करायचा असेल, तर महाविकास आघाडीत आपण गेलेचे पाहिजे, अशी आग्रही मागणी आता वंचितमधील नेते व कार्यकर्तेही आंबेडकरांकडे करू लागले आहेत. यासोबतच भाजपच्या पराभवासाठी वंचितने थोडी तडजोड करावी आणि ‘मविआ’सोबत जावे, असा आग्रह आंबेडकरांच्या कुटुंबीयांनीही धरला आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र निश्चित होण्याची शक्यता आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close