लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सहा महिन्यांतच देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : लोकसभा निवड़णुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने ४०० जागांचा दावा केला आहे.
त्यामुळे एनडीएला ४०० जागा मिळतात की नाही याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. पण या निवडणुकीच्या निकालानंतर सहा महिन्यांतच देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानामुळे विरोधकांनी देखील धसका घेतला आहे. मोदींचा हा इशारा नेमका कोणासाठी होता जाणून घेऊयात.
पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये बोलताना म्हटले की, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार राज्याची लोकसंख्या बदलण्यात व्यस्त आहे. तुमचे एक मत देशाची राजकीय दिशा बदलेल. 4 जूननंतर येत्या 6 महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. घराणेशाहीच्या राजकारणावर अवलंबून असलेले अनेक राजकीय पक्ष आपसूकच कोसळतील. त्यांचेच कार्यकर्ते आता थकले आहेत. देशाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे आणि त्यांच्या पक्षांची स्थिती काय आहे, हे त्यांनाच माहीत आहे, मात्र ते कोणत्या राजकीय भूकंपाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी उघडपणे सांगितले नाही.
काकद्वीप येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ही भविष्यवाणी केली आहे. भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते बंगालमध्ये पोहोचले होते. पीएम मोदी म्हणाले की, ममतांचं सरकार तुष्टीकरणाचं राजकारण करते, येथे संतांवर हल्ले होतात. याशिवाय केंद्रीय योजनाही बंद केल्या जात आहेत. बंगालमध्ये घुसखोरी झपाट्याने वाढत आहे. पीएम मोदी म्हणाले की, या लोकांना बंगालमध्ये घुसखोरांनी येऊन स्थायिक व्हावे असे वाटतेय.
पीएम मोदी म्हणाले की, ‘बंगालमधील तरुणांच्या हातून घुसखोर संधी हिसकावून घेत आहेत. ते तुमच्या जमिनी आणि मालमत्तांवर कब्जा करत आहेत. संपूर्ण देशात यामुळे चिंतेचे वातावरण आहे. सीमावर्ती भागातील लोकसंख्या वाढत आहे. टीएमसी सीएएला विरोध का करते आणि खोटे का पसरवले जातेय?
बंगालमधील लोकसभेच्या ९ जागांवर १ जून रोजी मतदान होणार आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपला येथून १८ हून अधिक जागांची आशा असेल. लोकसभा निवडणुकीतील बंगालमधील ही माझी शेवटची रॅली असल्याचे पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान सांगितले. यानंतर ते ओडिशाला जाणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पीएम मोदी पंजाबमध्ये प्रचार करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी कोलकाता येथे रोड शो केला होता.