
कराड : कराड तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील जवळपास 60-70 गावातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन गेल्या दोन महिन्यापासून पाण्याविना राहिल्याने प्रश्न गंभीर बनला होता. आज या कृष्णा कालव्यात पाणी खळाळल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत. याबाबत कराड तालुक्यातील विशेषतः कार्वे, वडगाव हवेली, शेरे, शेणोली आदी भागातील शेतकऱ्यांनी आ.पृथ्वीराज चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्याची विनंती केली त्यानुसार आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन त्यानुसार कृष्णा खोरे चे कार्यकारी संचालक यांना पत्राच्या माध्यमातून 20 मार्च 2024 रोजी पाठपुरावा केला. पण तरीही पाणी सोडण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याने संबंधित गावातील शेतकरी पुन्हा एकदा पृथ्वीराज बाबांच्या भेटीला आले त्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी 26 मार्च रोजी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना फोनच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत तसेच उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिल्यानंतर सचिवांनी तात्काळ परिस्थिती समजून घेऊन पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या व तसेच कृष्णा खोरेच्या कार्यकारी संचालक यांनी सुद्धा पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या आहेत अशी माहिती फोन वरून आ. चव्हाण यांना दिली. दुसऱ्या दिवशी (27 मार्च) पाणी खोडशी धरणातून सोडण्यात आले. त्यानुसार आज गुरुवार दि. (28 मार्च) रोजी पाणी कृष्णा कालव्यात आले आहे. आ. पृथ्वीराज बाबांच्या या तत्पर व तळमळीबद्दल शेतकऱ्यांनी पृथ्वीराज बाबांचे फोनवरून आभार मानले.
कृष्णा कालवा कऱ्हाड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातून वाहतो. येथून जवळपास 60-70 गावातील शेतीला पाणी मिळते. गेल्या दोन महिन्यात कालव्यातील पाण्याचे आवर्तन थांबले होते. कालव्यातील पाण्यातील आधारावर ऊस, भाजीपाला, द्राक्षे पिकांना पाणी दिले जाते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पाटबंधारे विभागाच्या कृष्णा कालवा विभागाकडून पाण्याचे आवर्तन सुरू करण्याबाबत दिरंगाई होत होती.
कृष्णा कालव्यात पाणी सोडणे आवश्यक असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता यांना सांगितले. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन परिस्थिती बाबत कार्यकारी संचालक यांना पत्र पाठवून पाठपुरावा केला. ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळाची परिस्थिती उद्भवली असून गेली दोन महिने कालव्यात पाणी नसल्याने पिके वाळायला लागली होती. पाण्याचे आवर्तन तात्काळ न मिळाल्यास पिके जळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता. लाभधारक शेतकऱ्यांकडून कालव्यात त्वरित पाणी सोडण्याची मागणी होत आहे. उच्च न्यायालयाच्या २००४ च्या आदेशानुसार कृष्णा कालव्यावरील खोडशी धरणात २.७ टीएमसी पाण्याची तरतूद करणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधित कऱ्हाड येथील कृष्णा कालवा विभागास पाणी सोडण्यास आदेश व्हावा. असे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लेखी पत्रात नमूद केले आहे. यानुसार आजपासून कालव्यात पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.