आमदार निलेश लंके यांनी अखेर हाती घेतली तुतारी

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज अखेर त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. निलेश लंके हे मागच्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या संपर्कात होते.
नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके इच्छुक होते. आता निलेश लंके यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. काहीच दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती.
निलेश लंके यांना नगर दक्षिणमधून तिकीट मिळालं तर त्यांची लढत भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध होईल. नगरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. लंकेंचा राजीनामा अजित पवारांसाठी धक्का मानला जात आहे. मागच्या वर्षी अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये लंकेंचा समावेश होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देताच निलेश लंके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शरद पवार साहेबांसमोर आमदारकी काहीच नाही, मी शब्दाला पक्का आहे असं निलेश लंके म्हणाले. तसंच त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही टीका केली. माझ राजकारण संपवण्याचे प्रयत्न केले गेल्याचा आरोपही निलेश लंके यांनी केला आहे. या कार्यक्रमात बोलताना निलेश लंके भावुक झाले.