
कराड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चरेगाव येथील नराधमास 20 वर्ष सश्रम कारावास आणि 35 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी सरकार पक्षाचा युक्तीवाद व सादर केेलेले पुरावे ग्राह्य मानून ही शिक्षा सुनावली आहे.
संशयित आकाश माने हा अल्पवयीन मुलीशी मोबाईलद्वारे संपर्क वाढवून प्रेमसंबंध ठेव, फ्रेंडशीप कर असे वारंवार म्हणून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच संबंधित अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून संशयित आकाश माने याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अल्पवयीन मुलीने प्रतिकार केल्याने गालावर मारत संशयिताने मुलीला तुझ्या घरातील लोकांना मारून टाकण्याची धमकी दिली होती आणि त्यानंतर नराधमाने ओढणीने हातपाय बांधून संबंधित मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर संशयिताने स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार करत अॅट्रासिटीची केस करण्याची धमकी देत मोबाईलवर फोटोही काढले होते. तसेच मोबाईलवर काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून अॅड. आर. सी. शहा व आर. डी. परमाज यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तीवाद व सादर केलेले पुरावे ग्राह्य मानत नराधम आकाश माने याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.