बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी

मुंबई : बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होत आहे. यापूर्वी २४ जानेवारी रोजी बारामती अग्रो त्यांची पहिली ईडी चौकशी झाली होती.
आज दुसऱ्यांदा रोहित पवारांची ईडी चौकशी होत आहे. दरम्यान, आमदार रोहित पवारांविरोधात होणाऱ्या ईडीच्या कारवाई विरोधात शरद पवार गटाचे विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. यातच आता शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचल्या आहेत.
राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू असून प्रतिभा पवार राष्ट्रवादी कार्यालयात पोहचल्या आहेत. पहिल्यांदाच त्या अशावेळी राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीने १९ जानेवारी रोजी समन्स बजावले होते. २४ जानेवारी रोजी तब्बल १२ तास रोहित पवारांची ईडी चौकशी झाली होती.
रोहित पवार यांची याआधी चौकशी झाली होती तेव्हा ते म्हणाले होते की, मला कुणासमोर वाकायला आवडत नाही, पण महाराष्ट्राच्या स्वाभीमानी जनतेसमोर झुकायला काही हरकत नाही. काही झालं तरी त्यांच्यासमोर वाकणार नाही. बापमाणूस माझ्या मागे, पवार साहेब पळणाऱ्यांच्या मागे नाही, लढणाऱ्यांच्या मागे राहतात.
इंदापूर तालुक्यात शेटफळ इथं बारामती अॅग्रोच्या डिस्टलरी प्लांटला नोटीस बजावण्यात आली होती. तसंच प्लांट बंद करण्याचे आदेशही दिले होते. या आदेशानतंर रोहित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत प्रदुषण मंडळाच्या निर्णयाविरोधात आव्हान दिलं होतं. तेव्हा ही कारवाई सूडभावनेतून केल्याचं रोहित पवार म्हणाले होते.