
कराड : विवाहितेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करीत विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. डी. बी. पतंगे यांनी शुक्रवारी ही शिक्षा ठोठावली.
अर्जुन यशवंत कुंभार (रा. कराड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विवाहिता १८ मार्च २०२१ रोजी हातगाड्यावर कपडे विक्री करीत असताना आरोपी अर्जुन कुंभार हा मद्यधुंद स्थितीत त्याठिकाणी आला. त्याने विवाहितेला शिवीगाळ करीत याठिकाणी हातगाडा लावायचा असेल तर मला पाचशे रुपये दे, असे म्हणून गाड्यावरील कपडे खाली पाडले. जातीवाचक शिवीगाळ केली. विवाहितेने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने तिला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. यावेळी पीडित महिलेचा पती त्याठिकाणी आला असता आरोपी अर्जुन कुंभार याने त्यांनाही मारहाण केली.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. आर. डी. परमाज यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक पाटील यांच्यासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षाने केलेल्या युक्तिवाद व साक्ष ग्राह्य धरून न्या. पतंगे यांनी आरोपीला गुन्ह्यात दोषी धरले. या गुन्ह्यात आरोपीला विविध कलमान्वये तीन वर्ष सश्रम कारावास आणि १२ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील जखमीला दंडाच्या रकमेतून नुकसान भरपाई म्हणून सात हजार रुपये देण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे.