कृषीराज्यसातारा

आधुनिक देशासाठी शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम होणे महत्त्वाचे : प्राचार्य डॉ. मोहन राजमाने

कराडच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप ; शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण

कराड : शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी ऋषीतुल्य म्हणून दिली होती. पदवीप्रमाणे ते लोक कल्याणकारी विचाराचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या कार्याची ओळख आपणाला कृषी प्रदर्शनातून पटते. आजकाल प्रगत देशाची स्वप्ने आपण सर्वचजण पाहतो. त्याचबरोबर आधुनिक देश करण्यासाठी शेतकरी आर्थिक दृष्टया सक्षम करणे गरजेचे आहे. शेती आधुनिक पद्धतीने केली पाहिजे. व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाचे मुल्यवर्धन केले पाहिजे. असे प्रतिपादन सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले.

शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने चार दिवस भरविण्यात आलेल्या १९ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषि, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संभाजीराव मोहिते अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील – उंडाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष जाधव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजीराव काकडे, संचालक सतीश इंगवले, नितीन ढापरे, उद्धवराव फाळके, संभाजी चव्हाण, गणपत पाटील, वसंतराव पाटील, जे. बी. लावंड, सर्जेराव गुरव, जयंतीलाल पटेल, प्रभारी सचिव आबासाहेब पाटील, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, डायनॅमिक इव्हेंटचे धीरज तिवारी, सचिन पाटील, राजेंद्र हेळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मोहन राजमाने म्हणाले, शेतकऱ्यांना नवनवे तंत्रज्ञान समजावे, यातून त्यांची शेती आधुनिक करण्यासाठी कृषी प्रदर्शन हे एकमेव छत आहे. शेतीतील उत्पादन व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्याकरिता पारंपरिक शेतीबरोबर पूरक व्यवसायांना शेतकऱ्यांनी जवळ केले पाहिजे.

ते म्हणाले, प्रत्येक गोष्टीत गुणवत्ता टिकवण्याची स्पर्धा सुरू आहे. त्याचप्रमाणे शेतीमध्ये गुणवत्तेला महत्व आले आहे. किती उत्पन्न घेतो, यापेक्षा त्या उत्पादनाची गुणवत्ता महत्वाची असल्याने आपल्याला गुणवत्तापूर्ण माल निर्माण केला पाहिजे. त्याकरिता कराडचे प्रदर्शन शेतकऱ्यांच्या जीवनात उपयुक्त ठरेल.

ते म्हणाले, गुणवत्ताधारक माल मिळवण्यासाठी कृषी प्रदर्शन हे मोठे माध्यम आहे. शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर किंमत मिळताना दिसत नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. शहरीकरण वाढले असून, खताच्या किंमती वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या एकट्याच्या नसून, त्या सर्वांच्या आहेत. या प्रदर्शनातून शेतकरी सबळ होईल. व स्वतः च्या पायावर उभा राहील.

संभाजीराव मोहिते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे चारित्र्य प्रांजळ होते. त्यांनी सर्वसामान्य जनतेला आपल्या बरोबरीने वागणूक दिली. त्यांच्या शेती व शेती उपयुक्त योग्यतेच्या वस्तूंना योग्य मोल दिला. प्रत्येक कार्यातून समाज जीवनाला समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. युग पुरुषांनी आपल्या जीवनाला आकार दिला. त्यांना आपण विसरता कामा नये.

यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यामध्ये कराड दक्षिण विभागातून अनुक्रमे मानसिंग थोरात (ओंड), बबन चव्हाण (लटकेवाडी – सवादे) माणिकराव पाटील (आटके), बाळकृष्ण पाटील (जखिणवाडी), विश्वनाथ मोहिते (पोतले), विजय जाधव (कार्वे) व कराड उत्तर विभागातून प्रशांत यादव (कवठे) दिनकर काळभोर (हरपळवाडी), राजेंद्र सुर्यवंशी (भोळेवाडी), सुनील जाधव (सैदापूर), प्रकाश पवार (बेलवडे हवेली), बाजीराव थोरात (नडशी) तसेच प्रशांत गरुड (येणके) यांचा उत्तेजनार्थ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ, गुळाची ढेप असे पुरस्काराचे स्वरूप होते.

याचबरोबर कराड पंचायत समितीच्या वतीने घेतलेल्या विविध पीक स्पर्धेतील विजेत्यांचा शेतकऱ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला. सभापती प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संभाजीराव काकडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. धनाजी काटकर, फलटणच्या यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष महेशकुमार जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती अशोकराव पाटील – पोतलेकर, कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख, आनंदराव सुतार, अधिकराव जगताप यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close