मविआचे खासदार फुटण्याच्या चर्चा, बिहारमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’, मोदी-शाह एका दगडात दोन पक्षी मारणार!

मुंबई : लोकसभेला जोरदार यश मिळवल्यानंतर विधानसभेला ढेपाळलेल्या महाविकास आघाडीला महायुतीने नेस्तनाबूत करीत पुनरागमन केले. राज्यातल्या बदललेल्या समीकरणांनुसार राजकीय वाऱ्यांची दिशा कळाल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरल्याची जोरदार चर्चा आहे
महाविकास आघाडीचे काही खासदार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच भाजपकडूनही ‘ऑपरेशन लोटस’ची तयारी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या अनुषंगाने ‘बिहार पॅटर्न’ चर्चेत होता, मात्र आता आघाडीच्या काही खासदारांचा संभाव्य प्रवेश घडवून भाजप बिहारमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. महाराष्ट्रात १३२ जागा निवडून आणून भाजपने जसे एकनाथ शिंदे यांचे अवलंबित्व कमी केले, तसेच मविआचे खासदार फोडून केंद्रात नितीश कुमार यांचे अवलंबित्व कमी करण्याचा मोदी-शाह यांचा डाव असल्याचे सांगितले जाते.
बिहारमध्ये पुढील काही महिन्यांतच विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचे अवलंबित्व जेडीयू अर्थात जनता दल संयुक्त पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्यावर फार मोठे आहे. बिहारमध्ये भाजप एकहाती सत्ता आणू शकतो, अशी परिस्थिती तूर्त तरी नाही. त्यामुळेच सत्तेत राहायचे असल्यास अनेकदा पलटी मारूनही नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवल्याखेरीज भाजपकडे कोणताही पर्याय नाही.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा दिलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी घौडदौडीला मतदारांनी ‘ब्रेक’ लावला. त्यामुळे भाजपच्या लोकसभा खासदारांची संख्या ३०३ वरून २४० वर आली. गेली १० वर्ष मित्रपक्षांकडे कानाडोळा करणाऱ्या भाजपला यंदा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवर सत्तेत बसायला लागले. याची मोठी बोच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लागून राहिली आहे.
नितीश कुमार यांची ओळखच ‘पलटूराम’ आहे. ते कधी आपला ‘पाला’ बदलतात, याचा थांगपत्ता त्यांच्या सहकाऱ्यांनाही लागत नाही. त्यामुळे त्यांच्यावर सदा सर्वकाळ भरोसा ठेवण्याची चूक भारतीय जनता पक्ष करणार नाही. महाराष्ट्रात भाजपला पुन्हा ‘अच्छे दिन’ आल्याने आघाडीच्या काही खासदारांना आपल्याकडे खेचून आणि पुन्हा निवडणुका घेऊन विजयी खासदार थाटात मोदींचे ‘बाहू’ बळकट करतील. लोकसभा खासदारांची संख्या वाढल्याने केंद्रात केंद्रात नितीश कुमार यांच्यावरील अवलंबित्व आपोआप कमी होण्यास मदत होईल, असे भाजपमधील जाणकार सांगतात.
महाराष्ट्रात भाजपने विरोधी पक्षात असताना आघाडीतील अंतर्विरोधाची वाट पाहून मोक्याच्या क्षणी संधी साधली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या १३३ जागा आल्याने एकनाथ शिंदे यांचे महत्त्व भाजपच्या दृष्टीने अत्यंत कमी झाले आहे. आगामी काही राज्यांच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचे महत्व कमी करून भाजप एकहाती सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल, असे डावपेच दिल्लीतील जाणकार आखत आहेत.
महाराष्ट्राचा निकाल लागल्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी बरेच दिवस दबावतंत्राचा वापर केला. भाजपचे जास्त आमदार असूनही बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले गेले, तसाच बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबविला जावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. मात्र ही मागणी केराच्या टोपलीत फेकून भाजपला अजिबात दबावाला बळी पडली नाही. आता मुख्यमंत्रिपदाबाबतचा हाच प्रयोग बिहारमध्ये राबविला जाणार का? अशी भीती नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षालाही वाटत आहे, हे नव्याने सांगायला नकोच!