
कराड ः ओगलेवाडी-टेंभू रोडवर गोवारे फाट्यानजीक भररस्त्यात महिलेने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतल्याची घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामध्ये महिला गंभीर भाजल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. संबंधित युवतीची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोवारे बाजूकडून गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक महिला ओगलेवाडी-टेंभू रोडवरील गोवारे फाट्यावर आली. त्याठिकाणी बराचवेळ ती एकटीच रस्त्याकडेला उभी राहिली होती. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांनी तिला पाहिले होते. मात्र, ती कोणाचीतरी वाट पाहत असावी, असा समज झाल्याने तिच्याकडे कोणी विचारपूस केली नाही.
दरम्यान, काही वेळातच ग्रामस्थांना समजण्यापूर्वीच महिलेने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत पेटवून घेतले. ग्रामस्थांनी आग विजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत गंभीररित्या भाजलेल्या त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत महिलेची ओळख पटली नव्हती.

