Uncategorized

२५ मे पर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल

पुणे : दहावी व बारावीची परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. निकाल वेळेत लावण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. त्यानुसार २५ मे पर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल, अशी माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होईल, असेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला १७ लाख तर इयत्ता बारावीसाठी १२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आता इयत्ता बारावीच्या ९९ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जात आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापूर्वीच नोंदवून ठेवले असून आता उत्तरपत्रिका तपासून जशा जशा पूर्ण होतील तसे गुणपत्रिका तयार होत आहेत.

आता एका महिन्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर इयत्ता दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. गतवर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी लागला होता. यंदाही त्याचवेळी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर होईल, असेही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

१) ओपन बुक परीक्षा पद्धती : विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पुस्तक घेऊन परीक्षा देता येईल. पण, परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त राहील. विद्यार्थ्यांना उत्तर पाहून लिहिताना स्वत:चा सविस्तर अभ्यास परीक्षेपूर्वी करावाच लागेल असा हा पॅटर्न असणार आहे.

२) सेमिस्टर पॅटर्न : दहावी व बारावीच्या परीक्षा आता वर्षातून एकदाच नव्हे तर दोन सेमिस्टरमध्ये होतील. पदवी, पदव्युत्तरच्या धर्तीवर भविष्यात दिवाळीपूर्वी एक तर उन्हाळ्यापूर्वी एक सेमिस्टर होईल. अजून त्यासंदर्भात काही निर्णय झाला नाही, पण भविष्यात काळानुसार हा बदल होवू शकतो.

दहावी- बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा पार पडेल. त्यांचा निकाल काही दिवसांत जाहीर होईल आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेता येईल, असे बोर्डाचे नियोजन आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close