महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये रोड शो

नाशिक : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात समावेश असलेल्या नाशिक मतदारसंघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये गुरुवारी रोड शो केला.
हा रोड शो सुरु असताना हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या रोड शो वेळी प्रचाररथ रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी एका चौकात ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले. तेव्हा घडलेल्या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरु झाल्यानंतर एका चौकात ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोळका करुन उभे होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रचाररथ येताना दुरुनच पाहिले. त्यानंतर ठाकरे गटाच्या सैनिकांनी ’50 खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दूर अंतरावर रोखून ठेवले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांचा प्रचार रथ चौकात येताच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणखी जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. हा आवाज एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडे पाहत धनुष्याची प्रत्यंचा ताणत बाण सोडल्याचा अभिनय केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा प्रचार रथ पुढे निघून गेला.
नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटात थेट लढत असल्याने दोन्ही बाजूंनी आक्रमकपणे प्रचार केला जात आहे.
नाशिकची जागा महायुतीसाठी महत्त्वाची असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांत दुसऱ्यांदा नाशिकमध्ये आले आहेत. गेल्यावेळी शिंदे नाशिकमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये पैसे असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे गुरुवारी नाशिकच्या हेलिपॅडवर लँड झाले तेव्हा पोलिसांनी स्वत:हून त्यांच्या बॅगांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या बॅगेत कॅमेऱ्याचे साहित्य, कपडे, औषधं आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही.